नवी मुंबई हिट ॲण्ड रन प्रकरणी दोघांना अटक; चालकाकडे परवाना नसल्याचंही उघड

Spread the love

नवी मुंबई हिट ॲण्ड रन प्रकरणी दोघांना अटक; चालकाकडे परवाना नसल्याचंही उघड

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईतील हिट एन्ड रन प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीनं रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी जो चालक गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. दरम्यान, दोघांच्या मेडिकल टेस्ट केल्या असून यामध्ये दोघांनीही मद्यपान केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नवी मुंबई हिट एन्ड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक केली आहे. सुभाष शुक्ला हा गाडी चालवत होता. तर भगवत तिवारी हा त्याच्या बाजूला बसला होता. ड्रायव्हर असलेल्या भगवत तिवारी यानं त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला याला गाडी चालवायला दिली होती. या सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ मध्ये शनिवारी दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकानं दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालक तिथून फरार झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार आणि ऑटो रिक्षाचा चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळालं. या अपघातात ऑटो चालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. अपघातानंतर इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या इनोव्हा गाडीनं अपघात झाला, ती भगवत तिवारी याच्या नावावर होती. मात्र, अपघात झाला त्यावेळी मात्र भगवत तिवारी बाजूच्या सीटवर बसलेला. तर, गाडी त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला चालवत होता. सुभाष शुक्लाला गाडी चालवायला येत नव्हती. तसेच, सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon