वरळीतील स्पामध्ये प्रेयसीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी अलेल्या कुख्यात चुलबुल पांडेची हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शहरातील वरळीमध्ये ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्पामध्ये घुसून गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडेची हत्या करण्यात आली. त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. सायन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अप्सरा बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान केल्यानंतर पांडे त्याच्या प्रेयसीसह सॉफ्ट टच स्पामध्ये गेला होता. काही दिवसांपूर्वीच पांडेचा वाढदिवस झाला. तोच साजरा करण्यासाठी पांडे स्पामध्ये गेला होता. वरळी नाका परिसरात असलेल्या मांजरेकर इमारतीच्या तळमजल्यावरील स्पा गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. पण पांडेच्या प्रेयसीचे स्पाच्या मालकांशी चांगले संबंध असल्यानं दोघांना स्पामध्ये जाता आलं. पांडे आणि त्याची प्रेयसी स्पामध्ये असताना तीन अज्ञात व्यक्ती आत शिरल्या. त्यांच्याकडे सुरे आणि चॉपर होते. त्यांनी सोफ्यावर बसलेल्या पांडेवर सपासप वार केले. पांडेवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात पाच एफआयआर दर्ज आहेत.
वरळी पोलिसांना दुपारच्या सुमारास या घटनेची माहिती देणारा कॉल आला. सॉफ्ट टच स्पामधील सोफ्यावर एक मृतदेह पडलेला असल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणात पांडेची प्रेयसी आणि आणखी एक जण प्रमुख साक्षीदार आहेत. त्या दोघांची नावं पोलिसांकडून सांगण्यात आलेली नाहीत. दुपारच्या सुमारास कॉल आल्यानंतर आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही तातडीनं घटनास्थळी पोहोचलो. मृताच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. आम्ही या प्रकरणात एफआयआर नोंदवला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे,’ अशी माहिती पोलील दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. पांडे आणि त्याच्या प्रेयसीवर कोणीतरी वॉच ठेवला होता. ते दोघे स्पामध्ये शिरल्यावर कोणीतरी याबद्दलची टिप मारेकऱ्यांना दिली. हा खून अतिशय सुनियोजितपणे केल्याचं प्राथमिक तपासातून कळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम १०३ च्या अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.