साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत आढळले मृत अर्भक; संस्थानच्या दाव्यानं प्रकरणाचे गूढ वाढलं
योगेश पांडे / वार्ताहर
शिर्डी – मुलगा आणि मुलगी समान हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुन्हा एकदा ‘ती’ जन्माला आली म्हणून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास स्त्री जातीच बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडी मध्ये आढळून आलंय. सफाई कर्मचारी सफाई करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॅरीबॅग मध्ये जड वस्तू दिसल्याने ते उघडून पाहिले असता त्यात स्त्री जातीच अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल अर्भक मृत अवस्थेत आढळून आलं. या घटनेनंतर रुग्णालयासह परिसरात एकच खळबळ उडाली. चौकशी केली असता सदर अर्भक हे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्माला आले नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत साईबाबा संस्थान पोलिसात तक्रार दिली असून सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासह परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी सध्या पोलीस प्रशासन करत असून, नेमकं हे अर्भक कुणी आणून टाकलं का? या बेवारस मृत अर्भकाचे माता-पिता कोण? याचा तपास करण्याचे आवाहन आता पोलिसांसह रुग्णालय प्रशासनासमोर आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ते बेवारस मृत अर्भक अज्ञाताने साईनाथ रुग्णालयाच्या कचरा कुंडीत आणून टाकल्याचा दावा केला आहे. अर्भकाचा मृतदेह गळा आवळलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती ही गाडीलकर यांनी दिली आहे. सोबतच त्या दिवशी रुग्णालयात एकही प्रसूती झाली नसल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. साई संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्याने आता या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले असून या प्रकरणाची अधिक माहिती सध्या पोलीस करत आहे. या प्रकरणी कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटणेमुळे साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.