पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई; हातभट्टीची दारु तयार करणाऱ्याला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बनावट गावठी हातभट्टी बनवणारा कारखाना उध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. रामभोला मकाशी नानावत – २० असे गुन्हे शाखेनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या आधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीत गस्त घालत असताना त्यांना याबाबतची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार फळीवस्ती येथील ओढ्यालगत पोलिसांनी छापा टाकला असता रामभोला नानावत हा भट्टी लावून दारू काढत असल्याचे दिसून आले.त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी यावेळी केलेल्या कारवाईमध्ये रामभोला नानावत याच्या ताब्यात २ हजार लीटर कच्चे रसायन, १ मोठा लोखंडी बॅरल, ३५ लीटर तयार दारू असा एकूण ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ब)(क)(फ) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.