शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणात आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पोलिसांकडून नोटिस
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणात परिविक्षाधीन आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या अडचणी वाढू शकतात. पुणे पोलीस आयुक्तांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दहा दिवसाच्या आत मनोरमा यांना नोटीसीला उत्तर द्यावं लागणार आहे. जर त्यांनी आपली बाजू मांडली नाही तर त्यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द केला जाईल. पुणे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवली, यामुळे तक्रारदारांकडून भीती व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पूजा खेडकरच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पूजा खेडकर यांची आई मनोरमा या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांशी बोलत आहे. यावेळी मनोरमा यांच्यासोबत काही बॉडी गार्डही दिसत आहेत. मुळशी तालुक्यातील जमिनीवरून मनोरमा या शेतकऱ्यांशी वाद घालताना दिसत आहे. आयएएस पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी ज्याप्रकारे मुळशी येथील गावकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, या विरोधात शेतकऱ्यांनी ग्रामीण पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना संपूर्ण प्रकरणाबद्दल दहा दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दहा दिवसात मनोरमा खेडकर यांनी या गोष्टींचा खुलासा केला नाही तर मात्र मनोरमा खेडकर यांच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्यांना अटक देखील होऊ शकते. स्वरक्षणासाठी हे शस्त्र वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याचा गैरवापर करून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप मनोरमा यांच्यावर केला जात आहे.
या संपूर्ण गोष्टींचा खुलासा मनोरमा खेडकर यांच्याकडून मागण्यात आलेला आहे. मात्र अद्याप तरी मनोरमा खेडकर यांनी याबाबत खुलासा केलेला नाही.