ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पुन्हा इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले; दोन वर्षांचा मुलगा जखमी

Spread the love

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पुन्हा इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले; दोन वर्षांचा मुलगा जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असतानाच, सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात ३५ ते ४० वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले. यात दोन वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ठाणे येथील वागळे इस्टेट भागात पडवळनगरमधील अजिंक्यतारा इमारत आहे. तळ अधिक ४ मजली असलेली ही इमारत सुमारे ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती २० सदनिका याप्रमाणे एकूण १०० सदनिका आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ३/११ या क्रमांकाची सदनिका संदेश शिवाजी पवार यांची आहे. या सदनिकेमधील हॉलच्या प्लास्टरचा काही भाग सोमवारी पहाटे पडला. यात स्मित संदेश पवार – २ वर्षे हा मुलगा जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून टाकला आहे. दरम्यान ही इमारत सी-२ बी या धोकादायक यादीत आहे. सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon