भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई ; टेम्पोसह ३८ लाख रुपयांचा गुटखा जप्त, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहर व परिसरातील ग्रामीण भागात बंदी असलेला गुटखा, सुवासिक सुपारी आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरुच आहे. पोलिस प्रशासना व्यतिरिक्त एफडीए विभागाकडून दररोज छापे टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात येत आहे. असे असतानाही शहरात गुटखा व तंबाखूच्या अवैध विक्रीला आळा बसलेला नाही. त्याच अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस युनिट-२ च्या पोलिसांनी बागे फिरदौस मशिदीमागील एका फ्लॅटवर छापा टाकून ३८ लाख २६ हजार ९०० रुपये किमतीचा प्रतिबंधित बिमल, केतन, एस.ए.के. सहीत आदी ब्रँडेड गुटखा व तंबाखू जप्त करण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सागर अशोक सुरळकर यांच्या फिर्यादीवरून निजामपुरा पोलिसांनी जावेद हॉटेलमधील रहिवासी मोहम्मद अस्लम अन्वर मन्सूरी आणि फजल अपार्टमेंटमधील रहिवासी अब्दुल्ला इसाउद्दीन खान यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली होती की, बागे फिरदौस मशिदीच्या मागे मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद अस्लम अन्वर मन्सूरी यांच्याकडे टेम्पोमध्ये भरून आणलेल्या विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप पकडली. जप्त केलेल्या टेम्पोसह गुटख्याची एकूण किंमत ३८,२६,९०० रुपये आहे. अब्दुल्ला इसाउद्दीन खान आणि तौसिफ खान हे या मालाचे विक्रेते आहेत. निजामपुरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी करीत आहेत.