राजकीय पक्षांव्यतिरिक्त गुन्हेगारांकडूनही उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध, गँगस्टर कडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी लढवणारे उज्ज्वल निकम यांच्या अडचणी वाढणार आहेत. अनेक हत्यांचा आरोप असलेला गँगस्टर विजय पालांडे उज्ज्वल निकाम यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावरील नियुक्ती रद्द करा, अशी मागणी आरोपी विजय पालांडे याने मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकाद्वारे केली आहे. या याचिकेत पालांडे याने निकाम यांची ओळख पूर्णपणे बदलली असल्याचे म्हटले आहे. जनतेच्या नजरेत निकम यांचे विचार, अजेंडा, उद्देश सर्व काही बदलले आहे. ते आता भाजपचे मोठे नेते असल्याचा दावा केला आहे. विजय पालांडे साल २०१२मध्ये उघडकीस आलेल्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. दिल्ली व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्यूसर करणकुमार कक्कड यांची हत्याचा आरोप पालांडे याच्यावर आहे. निकम भाजपचे नेते असल्यामुळे ते राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. पक्षाची प्रतिष्ठा जनमानसात उंचावण्यासाठी ते आता काम करतील. यासाठी हाय-प्रोफाइल प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा करण्यासाठी कोणत्याही थराला जातील, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे. आता पालांडे याच्या अर्जावर २८ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
उज्ज्वल निकम यांनी अनेक खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केले आहे. १९९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोट खटला, गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या आणि २००८ मधील मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांनी लढवला होता. तसेच २०१३ मधील मुंबई सामूहिक अत्याचार प्रकरण, २०१६ मधील कोपर्डी अत्याचार प्रकरणातही ते सरकारी वकील होते. उज्ज्वल निकम यांनी आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत ६२८ कैद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत नेले आहे. ३७ आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. अनेक हायप्रोफाईल खटले लढवल्यामुळे उज्जवल निकम यांना २००९ मधील २६/११ सुनावणी प्रकरणापासून जेड प्लस सुरक्षा दिली आहे. त्यांना भारत सरकारने २०१६ मध्ये पद्मश्री देऊन गौरविले आहे.