कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवलीत कौटुंबिक वादातून एका महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती उमा भारती असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. प्रीती या आपल्या कुटुंबासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित महिला आधीच रेलिंगच्या मागे उभी आहे. शेजारचे लोक तिला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या महिलेने कोणाचेही ऐकले नाही आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारते. त्यानंतर ती जमिनीवर पडते आणि बेशुद्ध होते. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईमध्ये कैद केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संबंधित महिलेला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. कौटुंबिक वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.