एटीएम कार्डची हेराफेरी; हातचलाखी करत फसवणूक, सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून, हेराफेरी करून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलवून एका अज्ञात व्यक्तीने पैसे काढले. याबाबत पीडिताने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केल्यानंतर भिवंडीतील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
एटीएम मशीनमध्ये पैसे काढणाऱ्या अज्ञात व्यक्तीबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला. यामध्ये भिवंडी गुन्हे शाखा घटक २ शहरामध्ये समांतर तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी विकी राजू वानखेडे याला उल्हासनगर येथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याजवळ अधिक चौकशी केली असता त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून तसेच पैसे काढणारे इसमाचे पिन नंबर पाहून एटीएममधून पैसे काढून फसवणूक केली. अशाच प्रकारे त्याने भिवंडी, दिवा, चेंबूर, मुंबई या भागात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.