कारागृह बनले खुनाचे अड्डे, कोल्हापुरच्या कळंबा जेलमध्ये १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्घृण हत्या; पाच जणांनी केली मारहाण

Spread the love

कारागृह बनले खुनाचे अड्डे, कोल्हापुरच्या कळंबा जेलमध्ये १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्घृण हत्या; पाच जणांनी केली मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर 

कोल्हापुर – मुंबईमधील १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कळंबा कारागृहात निर्घृण खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचे नाव आहे. रविवारी २ जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता निर्घृण खून करण्यात आला. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकनाने मुन्नाला मारहाण केली होती. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला. खूनाच्या प्रकरणारने कुख्यात होत चाललेल्या कळंबा जेलमध्ये खुनाची मालिका सुरुच आहे. त्यामुळे कळंबा जेलमधील बेशिस्त पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गांजा सापडणे, पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेल पुरते बदनाम झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कळंबा जेलच्या झाडाझडतीत ८० हून अधिक मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.

कळंबा जेलमध्ये कैद्यांकडे मोबाइल, गांजा पुरवठा, कारागृहात कैद्यांची हाणामारी, अशा सातत्याने घटना उघडकीस आल्या आहेत. सलग झालेल्या घटनांमुळे गंभीर दखल घेत श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. दरम्यान, एप्रिल महिन्यामध्येच मोबाईल वापरत असल्याची टीप तुरुंग अधिकाऱ्यांना दिली म्हणून जर्मन टोळीच्या म्होरक्यासह १४ जणांनी तुरुंगातील सुभेदारासह सराईत गुंड लहू रामचंद्र ढेकणेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत फिर्यादी तुरुंग सुभेदार उमेश शामू चव्हाण – ५१ हेही गंभीर जखमी झाले होते. तत्पूर्वी, ८ एप्रिल रोजी तंबाखूच्या पुड्यांमध्ये लपवून कैद्यांना गांजा पुरवला जात असल्याचा प्रकार समोर आला होता. कारागृहाची झडती घेताना सर्कल क्रमांक आठमध्ये कचरा कुंडीत सापडलेल्या तंबाखूच्या पुड्यांमधील २१४ ग्रॅम गांजा कारागृह पोलिसांनी जप्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon