
बेघर महिलेवर अत्याचार, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
रेल्वे फलाटावर राहणाऱ्या बेघर महिलेशी ओळख करून तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार घरी बोलवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपी विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण पश्चिम येथील करपे वाडी परिसरात राहणाऱ्या गुडडु उर्फ सिध्देश भाटकर (२९ ते ३०), कल्याण पूर्व येथील काकाच्या धब्याच्या पाठीमागे राहणारा राहुल देवराम बोरडकर (२८) अशी आरोपींची नावे आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये पिडीत महिलेने पतीचे घर सोडले. त्यानंतर तिने कल्याण येथील रेल्वे फलाटावर राहण्यास सुरुवात केली. यावेळी गुड्डू उर्फ सिद्धेश याच्या बरोबर तिची ओळख झाली. ही ओळख त्याने वाढवली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून करपे वाडी परिसरातील आपल्या घरी नेले. त्यांनतर तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अशाच प्रकारे राहुल बोरडकर याने देखील तिला वारंवार घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला असून तिला ठोष्या बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सध्या याच माध्यमातून त्या गरोदर असून त्यांनी या दोघांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.