
साक्षीदाराच्या टोपीवरून खरा गुन्हेगार अटकेत
विष्णू नगर पोलीस ठाण्याची कारवाई
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी साक्षीदाराची टोपी पडली होती. टोपी हाच मुख्य धागा पकडुन विष्णू नगर पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक केले आहे.
आरोपी अर्जुन आनंदा मोरे (३९) हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या डोंबिवली येथील बावन चाळ या परिसरात राहतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमरास डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर ज्या बावन चाळीत खून झाला होता त्याच ठिकाणी साक्षीदारांची टोपी पडलेली पोलिसांना सापडली. नेमका हाच धागा पकडून सीसीटिव्हीद्वारे या टोपी ला मिळती जुळती टोपी कोणी घातली आहे याचा अंदाज घेत साक्षीदाराला शोधून काढले. त्यानंतर साक्षीदाराने दारू पिऊन ही मारामारी झाली असून आरोपीचे नाव सांगितले. डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानाजवळ अर्जुन आनंद मोरे येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर भागशाला मैदानाजवळ सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे आणि मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. आर वडणे आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी या गुन्ह्याची उकल केली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.