
कचोऱ्यातील वृद्ध मजुराचे झोपडे उध्वस्त
झोपड्यातून सामान चोरणाऱ्या संधीसाधू चोरट्यावर झडप
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण जवळच्या कचोरे गावाजवळ असलेल्या न्यू गोविंदवाडीतील पाईपलाईन रोडला बारदान आणि पत्र्यांच्या साह्याने बांधलेल्या झोपडीत राहणाऱ्या रतन त्रिंबक ढालवाले (62) या गरीब मजुरावर भयंकर प्रसंग गुदरला. शुक्रवारी रात्री पाऊस पडल्यामुळे या वृद्ध मजुराची झोपडी पूर्णपणे तुटून पडली. या झोपडीतून चोरलेल्या सामानासह पोलिसांनी एका संधीसाधू चोरट्याला जेरबंद केले आहे.
पावसात या गरीबाची झोपडी पूर्णपणे उध्वस्त झाली. ही संधी साधून कुणीतरी चोरट्याने सदर झोपडीतील उघड्यावर पडलेले घरसामान चोरून नेले. या सामानाची किंमत जरी 11 हजारांच्या घरात असली तरी गरिबासाठी त्याची किंमत लाख मोलाची मानली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले घरसामान दिसेनासे झाल्याने वृद्धावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र तरीही स्वतःला सावरत या वृद्धाने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली. या वृद्धाची केविलवाणी अवस्था पाहून उपस्थित पोलिसांनी त्यांना मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करताना जमादार रमेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहीम राबवून काही अवधीत त्याच परिसरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या नासीर हुसेन पठाण (30) नामक बदमाश्याला अटक केली. या चोरट्याकडून वृध्दाच्या झोपड्यातील चोरलेले सर्व सामान हस्तगत केल्याचे जमादार रमेश चौगुले यांनी सांगितले. तसेच पावसामुळे पूर्णतः भुईसपाट झालेली या वृद्धाची झोपडी पूर्ववत उभी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने पोलिसांतील माणुसकीची दर्शन घडल्याची भावना परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे.