
माझ्या बाळाला माझ्याकडे द्या, विवाहित महिलेचा अमानुषपणे छळ
– नवरा बँकेत तर सासरा पोलीस उपनिरीक्षक
– महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
दिनेश जाधव : कल्याण
मला दिवसरात्र उपाशी ठेऊन मारझोड केली. इतकेच नव्हे तर माझ्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन फरार झाले. मला माझ्या तीन महिन्याच्या बाळापासून तोडले. मला माझे बाळ हवे आहे. असे हृदयद्रावक शब्द आहेत एका आईचे. विशेष म्हणजे या मुलीचा सासरा कल्याण येथील कंट्रोल कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करतो.
कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात हुंडाबळीची ही तक्रार दाखल झाली आहे.
23 वर्षांची भूमिका पवार नवीन संसाराची स्वप्नं पाहत मे 2019 मध्ये लग्न करून औरंगाबादहून कल्याणला आली खरी मात्र तिच्या या संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. लग्नानंतर केवळ तीन महिन्यातच सासू, नणंद आणि नवऱ्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दिवसभर काम करून झाल्यानंतर तिला उपाशी ठेवणे, पाच पाच मिनिटाला सतत तिच्याकडून लादी पुसून घेणे, चाकूने मारणे, छातीवर बसून गळा दाबणे, तिच्या तोंडात बोळा कोंबून ठेवणे अशा प्रकारे त्रास देण्याचे जणू घरात रोजचेच कट रचले जात होते. इतकेच नव्हे तर भूमिका कडून एका स्टॅम्प पेपरवर माझं काही झालं तर माझे माहेरचे लोक जबाबदार असतील असे लिहून घेतले.
घरी काही सांगितलेस तर भावाला गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी तिला दिली जात होती. आई वडील, बहीण, भाऊ यांना भेटून देखील देत नसतं. इतकेच नव्हे तर भूमिका गरोदर असताना देखील तिला त्रास देण्यात आला. भूमिकाला बाळ झाल्यानंतर ती रुग्णालयातून घरी आल्या आल्या तिला ढीगभर कपडे धुवायला लावले. अखेरीस शेजारच्या लोकांना भूमिकेने घाबरत आणि लपत छपत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शेजारच्या रहिवाशांनी या सगळ्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत तिच्या घरच्यांना कळवले. त्यांनतर औरंगाबादवरुन तिच्या घरचे आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. महात्मा फुले ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी माझ्या 33 वर्षातली नोकरीमध्ये इतका भयंकर प्रकार मी पहिल्यांदा पाहायला असे सांगितले. सध्या भूमिका हीचा पती प्रीतम, सासू जीजाबाई, नणंद पल्लवी, प्रियांका यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली असून अधिक तपास आम्ही करत आहोत.