
चोरी केलेल्या पाच रिक्षा आणि मोटार सायकल पोलिसांनी केले हस्तगत
– मानपाडा पोलिस ठाण्याची कारवाई
दिनेश जाधव : डोंबिवली
रिक्षा आणि मोटार सायकल चोरून त्या विकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपी कडून एकूण 5 रिक्षा आणि 5 मोटार सायकल असा एकूण पाच लाख 3 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.
डोंबिवली पूर्व परिसरातील कांचनगाव येथील रहिवासी असणारा आकाश ढोणे (19) असे आरोपीचे नाव आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलिस पथके स्थापन करण्यात आली आहे. मानपाडा पोलिसांतर्फे टायर करण्यात आलेल्या पथकांनी ज्या भागातून मोटार वाहने चोरी झालेली आहे त्या भागात असलेल्या ठिकाणी गस्त घालून संशयित इसमावर पाळत ठेवली होती. त्यानुसार संशयित आरोपी आकाश पोलिसांच्या नजरेस पडला. त्याची चौकशी केली असता तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता मानपाडा पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाणे या हद्दीतून रिक्षा व मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याचे सांगितले. चोरलेल्या रिक्षा व मोटारसायकली त्याने डोंबिवली पूर्व येथील निळजे गाव परिसरातील माऊली तलावाचे बाजूस असलेल्या झाडाझुडपात तसेच डोंबिवली पूर्व परिसरातील खंबाळपाडा मॉडेल कॉलेजच्या मैदानातील झाडाझुडपात लपवून ठेवल्या असल्याचे समोर आले. या सर्व रिक्षा व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास मनोडा पोलीस करत आहेत.