
देवगिरी एक्सप्रेस मध्ये बसलेल्या पाच प्रवाशांकडून एक करोड रुपये केले हस्तगत
कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई, अवैधरित्या रक्कम जवळ बाळगल्या चा संशय
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण स्थानकात देवगिरी एक्स्प्रेस मधून आलेल्या पाच जणांकडून एकूण 1 करोड एक लाख 55 हजार रुपये रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामध्ये 178.680 ग्रॅम सोने देखील जप्त केले आहे. हे पाच जण एका कुरिअर कंपनीत काम करत असल्याचे ते सांगत असून त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली या संदर्भात तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान ही रक्कम अवैध रित्या बाळगली असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला असून आयकर विभागाला देखील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
नांदेड येथे राहणारा 48 वर्षीय गणेश भगत, भुज येथे राहणारा 48 वर्षीय मयूर कापडी, परभणी येथे राहणारा 40 वर्षीय नंदकुमार वैध, नांदेड येथे राहणारा 55 वर्षीय संजय मनिककामे व जालना येथे राहणारा 45 वर्ष चांदु माकणे अशी या पाच जणांची नावे असून गणेश याच्याकडून 20 लाख 50 हजार रुपयाचे सोन्याची बिस्किटे, मयूर कापडीके यांच्याकडून 16 लाख 98 हजार रोख रक्कम, नंदकुमार यांच्याकडून रोख रक्कम 27 लाख 50 हजार, संजय माणिककामे यांच्याकडून रोख रक्कम 14 लाख आणि चांदु माकणे याच्याकडून रोख रक्कम 22 लाख 57 हजार असे एकूण एक करोड 1लाख 55 हजार इतकी रक्कम रेल्वे पोलिसांनी हस्तगत केली आहे.
कल्याण स्थानकात येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अवैध सामान येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसाना मिळाली. त्यानुसार त्यांनी ट्रेन मधील संशयितांची चौकशी केल्यानंतर पाच जण संशयितरित्या आढळून आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता ते एका खाजगी कुरिअर कंपनीत कामाला असल्याचे त्यांनी सांगितले. सामना संदर्भात माहिती देताना आम्ही फक्त कुरिअर पोहचविण्याचे काम करत असल्याचे सांगितले. मात्र पार्सल च्या सामानात काय आहे याची चौकशी रेल्वे पोलिसांनी केली असता हेपाची जण गोंधळलेले दिसले. हा धागा हेरून यांना अधिक चौकशी साठी फलाट क्रमांक 1 येथे नेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे मोठी रक्कम आणि सोने असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास रेल्वे पोलीस करत असून यासंदर्भात आयकर विभागाला देखील कळवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.