
बी.एस.यू.पी आणि पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांची तीन कोटींची केली फसवणूक
बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
बी.एस. यु. पी योजनेतील घर आणि दुकाने विकत देतो असे सांगून ४८ जणांना एका इसमाने बनावट कागदपत्र तयार करून 3 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान त्याने 48 जणांना बी.एस.यू.पी योजनेतील घरे तसेच दुकाने ताब्यात दिली नसल्याने त्या इसमा विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश पवार असे आरोपीचे नाव असून गोविंद भानुशाली यांच्या सांगण्यावरून फिर्यादी कांतालाल व फिर्यादीचे वडील शंकरलाल भानुशाली यांनी इंदिरा नगर येथे डीएसपी योजनेअंतर्गत बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी दोन दुकाने खरेदी करण्यासाठी सुरेश पवार यांना 12 लाख रुपये दिले. मात्र त्यांनी ना गाळे दिले ना पैसे परत दिले. इतकेच नव्हे तर 48 जणांना स्वस्त दरात दुकाने आणि घरे देतो असे सांगून त्यांची देखील फसवणूक केली. विशेष म्हणजे या सर्वांना कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हस्तांतरित केल्याचे बनावट कागदपत्र, बी.एस यू. पी चे बनावट कागदपत्र देऊन एकूण 3 कोटी 47 लाखांची पवार यांनी फसवणूक केली असून अधिक तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.