
वृद्ध महिलेचा विनयभंग करणारा वॉर्डबॉय जेरबंद
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवलीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा दोनदा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या विकृत वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
कानादास वैष्णव असे या आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील हॉस्पिटलमध्ये पीडित आजी उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान या वयोवृद्ध आजीसोबत गैरवर्तन करण्यात आले. ही वयोवृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूममध्ये गेली असता तेथील वॉर्डबॉय वैष्णवने महिलेसोबत हा प्रकार केला. एकदा हा प्रकार घडल्याने महिला वाटले की चुकून हा प्रकार झाला असेल मात्र या विकृत वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा असाच प्रकार केला.16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान या आजीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित आजीने ही बाब तिच्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.