
पतीच्या मित्रानेच पत्नीला मारून लपवले सोफा बेडमध्ये, एका चापलवरून केली गुन्हाची उकल
दिनेश जाधव : डोंबिवली
घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसल्याने मित्राच्या पत्नीला ठार मारून सोफा बेडमध्ये लपवल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या घटनेचा छडा एका चप्पलेमुळे लावला आहे.
मंगळवारी सायंकाळी सुप्रिया शिंदे (३३) या महिलेचा मृतदेह घरातील सोफाबेडमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात महिलेचा पती किशोर शिंदे यांनी गुन्हा दाखल केला होता.मंगळवारी सुप्रिया यांची तब्येत ठीक नव्हती अशातच किशोर यांचा मित्र विशाल घावट घरी पुस्तके देण्यासाठी आला होता. यावेळी सुप्रिया यांचा मुलगा श्लोक घरी होता. त्यानंतर विशाल यांनी मुलगा कधी शाळेत जाणार आहे याची चौकशी सुप्रिया यांच्याकडे केली. त्याप्रमाणे मुलगा शाळेत गेल्यानंतर विशाल पुन्हा १.३० च्या सुमारास सुप्रियाच्या घरी जाऊन पुस्तके दिली. मात्र यावेळी विशाल याने सुप्रिया यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुप्रियाने आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दाराजवळ आल्या. मात्र तोपर्यंत विशाल यांनी त्यांच्याकडे असलेल्या नायलॉन केबल टायने गळा आवळला. सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरातील सोफा बेड मध्ये लपवला. विशाल जेव्हा दुपारी आला होता त्यावेळी त्याची चप्पल त्याने बाहेर काढली होती. ही बाहेर काढलेली चप्पल एका साक्षीदाराने पाहिली. त्यांनतर पोलिसांनी मिळत्या जुळत्या चपलांचा शोध घेतला यावेळी विशालची चप्पल मिळती जुळती असल्याचे लक्षात आल्याने विशाल याला ताब्यात घेतले आहे.
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल पडवळ आणि कर्मचारी यांनी या गुन्ह्याची उकल केली.