
उद्वाहिनी साठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू
दिनेश जाधव: डोंबिवली
डोंबिवली येथील सागाव परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या उद्वाहीनीसाठी तयार करण्यात आलेल्याखड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे मृत मुलाचे वडील भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांचा 10 वर्षाचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही तो न सापडल्यामुळे पालकांची चिंता वाढली.नंतर मृत मुलाच्या आई-वडिलांनी आसपासच्या इमारतींमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. मात्र एका इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते; या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला. आपल्या मुलाचा मृतदेह आढळताच त्याच्या आईवडिलांना रडू कोसळले. त्यांच्यावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.
दरम्यान, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्या विरुद्ध ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तसेच लिफ्टचे काम सुरु होते तर योग्य ती खबरदारी का घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारण्यात येत असून अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.