
ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
– मानपाडा पोलिसांची कारवाई
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली – एका शिपिंग व्यवसायात एजंट म्हणून काम करत असताना पैशांच्या देण्या घेण्यातून वाद निर्माण झाल्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याच्या मित्रांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे
उत्तरप्रदेश येथील मनजीत यादव, धनंजय यादव, सोमप्रकाश यादव हे तिघा आरोपींना अटक केली असून हे तरुण अंदाजे वय २५ ते ३० वयोगटातील आहेत. मनजीत हा बेलापूर येथील शिपिंगचा व्यवसाय करत होता. त्याआधी मनजीत यादव आणि सुभाशिष बॅनर्जी हे एका ठिकाणी एजंट म्हणून काम करत असताना त्यांच्यात पैशांच्या हिशोबावरून वाद झाले होते. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी बॅनर्जी यांच्या पत्नीने घरातून जबरदस्तीने बॅनर्जी यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर बॅनर्जी यांच्या मुलीला पाच लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या वडिलांना ठार मारू असा फोन आला होता. याच फोनचा आधार घेत बॅनर्जी यांना विविध ठिकाणी लपणाऱ्या मनजीत यादव आणि सहकारी याला नालासोपारा येथील एका खाजगी लॉज मधून मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपयुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी दत्तात्रय सानप, सुनील तारमळे, प्रशांत वानखेडे आणि इतर सहकाऱ्यांनी या खटल्याचा उलगडा केला.