
डोंबिवलीतील त्या इमारतीवर केडीएमसीची कारवाई
अधिकाऱ्यांवर कारवाई होणार कधी ?
संतप्त रहिवाश्यांनी फोडला टाहो
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरातल्या शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या शिवदत्त कृपा या इमारतीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून मंगळवारी तोडक कारवाई सुरू केली. यावेळी बाधित झालेल्या रहिवाश्यांनी कल्याण-डोंबिवलीतील इतर बांधकामे दिसत नाहीत का ? आमचीच इमारत कशी दिसली ? लाचखाऊ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? असा टाहो फोडत संताप व्यक्त केला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल, ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे, इ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे, प्रभाग अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे, प्रभाग अधिक्षक शंकर धावारे यांच्या उपस्थितीत पोलिस फाट्यासह दुपारी या इमारतीवर पाडकामाची कारवाई सुरू केली. सदर इमारत प्रथम रहिवास मुक्त करून निष्कासनाच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्याचे वपोनि सचिन सांडभोर यांच्यासह पोलिस कर्मचारी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 जाॅ क्रशर मशीन, 1 पोकलेन, 1 जेसीबी, 10 मजूरांच्या साह्याने करण्यात ही कारवाई सुरू करण्यात आली.
तळ + 5 मजली असलेल्या या इमारतीवरील कारवाईदरम्यान रहिवाशांनी प्रचंड विरोध केला. काही रहिवाशांनी आपला संसार उघड्यावर पडणार बघून टाहो फोडला. तेथिल दुकानदारांनी आपले गाळे-दुकाने बचावासाठी अनोखा फंडा अवलंबिला. कर्मचाऱ्यांकडून या गाळ्यांचे शटर उघडताच आतील दुकानदाराने तोंडावर हात मारून बोंबाबोंब सुरू केली. मात्र पोलिसांनी गाळ्यात घुसून त्या दुकानदाराला ओढून बाहेर आणले. तर महिलाही जोरजोराने आरडाओरडा करत बोटे मोडून आकांडतांडव करताना दिसत होत्या. या पार्श्वभूमीवर उपस्थित रहिवाश्यांनी राजकीय पक्षांसह प्रशासनावर आगपाखड केली. आम्हाला आमच्या जागा द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा आरोळ्या ठोकल्या. या इमारतींना अनधिकृत घोषित करता खरे, पण या अनधिकृत इमारती उभ्या राहतात कश्या ? याकडे सरकार लक्ष देणार का ? महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? अश्या अनेक प्रश्नांची उपस्थित रहिवाश्यांनी सरबत्ती केली.