
पेट्रोलची उघड्यावर विक्री करणाऱ्या शहादा तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी – उमेश पांढारकर,नंदुरबार
नंदुरबार: नागरिकांचे जिवित धोक्यात घालून ज्वालाग्रही पदार्थ असणाऱ्या पेट्रोलची उघड्यावर विक्री करणाऱ्या तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील काथर्देदिगर येथे सुनिल राजेंद्र कोळी हा काथर्दे येथील बसस्थानकावर एका टपरीच्या आडोशाला पेट्रोलची विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून एक हजार ४३० रुपयांचे १३ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे.तसेच डोंगरगाव येथील बसस्थानकावरील एका टपरीच्या आडोशाला राजेंद्र पंडीत पाटील हा पेट्रोलची चोरटी विक्री करतांना आढळून आल्याने त्याच्याकडून सुमारे साडे पाच हजार रुपयांचे ५० लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले तर विठ्ठल सुभाष पाटील हेदेखील डोंगरगाव येथील एका टपरीच्या आडोशाला पेट्रोलची उघड्यावर विक्री करतांना आढळून आल्याने त्यांच्याकडून एक हजार ५४० रुपयांचे सुमारे १४ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे.तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.