
रस्त्यावरील वाहतूक कोंडीदरम्यान ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेला वाद दोन तरुणांच्या जीवावर बेतणार होता
सुदैवाने तेथे पेट्रोलिंगसाठी हजर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि दोन तरुणांचे प्राण वाचवले
दिनेश जाधव : कल्याण
ओव्हरटेकच्या वादातून भर रस्त्यात झालेल्या भांडणात एका तरुणाने दोन तरुणांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो तरुण हल्ला करण्याच्या तयारीत होता तितक्यात तेथे पेट्रोलिंग करण्याऱ्या पोलीस हवालदार प्रवीण देवरे आणि पोलीस नाईक उत्तम खरात, कुणाल परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी लगेच हल्लेखोर तरुणाचा हात पकडला आणि त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. त्यामुळे त्याचा हल्ल्याचा प्रयत्न फसला. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कल्याण काटेमानवली परिसरात ही घटना घडली. तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवले. त्यामुळे दोन तरुणांचे प्राण वाचले. पोलिसांच्या धाडसी कामगिरी आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी व्यापाऱ्यांना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाची छापील पत्रिका व्यापाऱ्यांना वाटण्याचे काम कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी देवरे, नाईक आणि खरात करत होते. याचदरम्यान हे कर्मचारी काटेमानीवली नाका ते चिंचपाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने ती कोंडी सोडविण्यासाठी पुढे सरसावले. याचदरम्यान त्यांना रस्त्यावर तीन इसम आपापसात भांडत असल्याचे दिसले. त्यातील एकजण हातातील चाकूने दोघांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. ते पाहून पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेचच त्या चाकुधारी हल्लेखोराला पकडून ताब्यात घेतले. मयूर दराडे असे या हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्याशी झालेल्या वादात विशाल पाटील आणि दिपेश रसाळ हे दोन जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्र्संगावधानाबद्दल त्यांचे वरिष्ठांनी तसेच नागरिकांनी कौतुक केले आहे.