
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी, अपहृत मुलांचा २ तासांचे आत घेतला शोध
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण पश्चिम रजीता महेश मोटा राहणार रामबाग नं. ४, साती आसरा मंदिरा जवळ, न्यु चिकणघर, कल्याण (प) यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात येवून हकीगत सांगितली की, त्या सायन कोळीवाडा मुंबई येथुन मागील १५ दिवसांपूर्वी कल्याण येथे वरील पत्त्यावर राहण्यास आल्या असुन त्यांची मुलगी कु. खुशी वय १३ वर्षे (शिक्षण-इयत्ता ८ वी) तसेच मुलगा कृष्णा उर्फ क्रिश वय ९ वर्षे (शिक्षण-चौथी) यांचेसह राहतात. त्या दिनांक ९ / १२ / २०२१ रोजी पहाटे ५.०० वा. चे सुमारास परेल, मुंबई येथे नोकरी निमित्त घरातुन निघुन गेल्या आणि रात्री १९.१५ वा. चे सुमारास घरी परत आल्या. तेव्हा घराचे दरवाजाला कुलुप लावलेले होते व दोन्ही मुले घरी किंवा आजुबाजुस आढळुन आली नाहीत. म्हणुन त्यांनी दोन्ही मुलांचा शोध आजुबाजुचे परीसरात व नातेवाईकांकडे घेतला. परंतु मुले मिळुन न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात येवुन तक्रार दिल्याने सदर मुलांचे अपहरण झाले बाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२० / २०२१ भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला.
वरील दाखल गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री दत्तात्रय कराळे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग श्री उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी अपहरण झालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी फिर्यादी महिला यांचेकडुन बारकाईने माहीती घेवुन वेगवेगळी पोलीस पथके तात्काळ तयार केली. फिर्यादी राहत असलेल्या परीसरात एक पथक, कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशन येथे एक पथक, आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात एक पथक पाठवुन शोध सुरु केला. तसेच अपहरण झालेली मुले मुळ राहणार निजामाबाद, तेलंगना राज्य येथील असल्याने ते गावी देखील जाण्याचा अंदाज बांधुन कसारा, इगतपुरी, नाशिक रोड येथील जी.आर.पी/आर.पी.एफ तसेच ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधुन त्यांना अपहरण झालेल्या मुलांच्या वर्णनासह माहीती दिली आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याची •पोलीस पथके कसारा व इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे रवाना केली. दरम्यान कसारा आर.पी.एफ.चे पोनि / हनुमान सिंह यांना माहीती दिल्यावरुन त्यांच्या पथकाने सदर अपहरण झालेली दोन्ही भावंडे मुलगा आणि मुलगी यांना इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे देवगिरी एक्सप्रेस मधुन रात्री १२.०० वाजताचे सुमारास सुखरुपपणे ताब्यात घेतले. सदर दोन्ही मुलांना त्यांची फिर्यादी आई सौ. रजीता महेश मोटा यांचे स्वाधीन केले आहे. मुलांचे अपहरण झाल्याची माहीती प्राप्त होताच पोलीसांनी अत्यंत वेगवानपणे तपासाची चक्रे फिरवुन अपहरण झालेल्या दोन्ही मुलांचा २ तासांचे आत शोध लावुन अत्यंत संवेदनशिल असलेला गुन्हा उघडकीस आणला .