
‘हर घर दस्तक’ अभियानातंर्गत, जिल्ह्यात 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन
प्रतिनिधी – उमेश पांढारकर ( नंदुरबार )
नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले आहे.
नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या अभियानांतर्गत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे पथक जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यातील घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील लसीकरण झालेल्या व लसीकरण न झालेल्या लाभार्थींची यादी तयार केली आहे. यात पहिला डोस, दुसरा डोस घेतलेले लाभार्थी तसेच स्थलांतरीत झालेल्या लाभार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
लसीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात, बँक, आठवडे बाजार, महाविद्यालय तसेच चेकपोस्टच्या ठिकाणी लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दूसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना कॉलसेंटर मधून फोन करुन लसीकरणाबाबत कळविण्यात येणार आहे. नर्मदा काठावरील गावातील नागरिकांचे लसीकरणासाठी बोट ॲब्युलन्सच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली असून तालुकास्तरावर कोविशिल्ड आणि कोव्हक्सिन लसीचा मुबलक साठा उपलब्ध करुन दिला आहे.
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील पदाधिकारी, शासकीय, निम शासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार, सरंपच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तर एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. हर घर दस्तक अभियानात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.