
गांजाची शेती करणाऱ्या वर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली धडक कारवाई, ८ लाख 30 हजाराची गांजाची झाडे जप्त
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
नंदुरबार :- शहादा तालुक्यातील घोटाळी येथे आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करुन ८ लाख ३० हजार ६९० रुपये किमतीचे ११८ किलो ६७ ग्रॅम वजनाचे ८३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
या बाबत आज पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत शहादा तालुक्यात घोटाळी येथे एका इसमाने त्याचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार आणि त्यांचे अंमलदार हे घोटाळी गावाच्या शिवारातील पाण्याचे तलावाजवळील कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले.
सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथून पळ काढला. त्याचा पाठलाग केला असता तो जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला.
कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे ११८ किलो ६७ ग्रॅम वजनाचे ८ लाख ३० हजार ६९० रुपये किंमतीची एकुण ८३ गांजाची झाडे मिळून आले.
संशयीत फाडया भंगी पावरा याच्याविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ अन्वये शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, प्रमोद सोनवणे, सजन वाघ, विनोद जाधव, मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, विशाल नागरे, राकेश वसावे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, दिनेश लाडकर, संजय रामोळे, पोलीस अमलदार विजय ढिवरे, यशोदिप ओगले, चालक संजय बोरसे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक परदेशी, पोलीस अंमलदार भरत ओगले, दिनकर चव्हाण यांच्या पथकाने केली.