
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे, दि. २५ मे : उरुळीदेवाची, हांडेवाडी परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील ६,५०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) जयसिंग काळुसिंग जुनी (वय-२८) २) सोमनाथ नामदेव घारुळे (वय-२४, दोघेही रा. बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर, पुणे) ३) बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (२४, रा. रामटेकडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून जयसिंग जुनी या आरोपीवर ११ गुन्हे दाखल असून सोमनाथ घारुळेवर ४ व बल्लुसिंग टाकवर ६३ गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी तसेच हांडेवाडी परिसरात दि. ३ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी चोरी केली होती. तसेच दि. ६ एप्रिलला संदीप सुर्यकांत चिंचुरे हे त्यांच्या साडूसोबत उरुळीदेवाची गावातून जात असताना सँट्रो कारमधून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले होते. वरील दोन्ही गुन्ह्यांबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांचा पोलीस तपास करीत असताना पोलीस नाईक अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर, निखील पवार यांना हांडेवाडी परिसरात दोन व्यक्ती मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मोकाशी यांच्या सूचनेनुसार सह. पोलीस निरीक्षक राजू महानोर व पोलीस अंमलदार हांडेवाडी येथे गस्त घालीत असताना दोन संशयित व्यक्ती हांडेवाडी ते उरुळीदेवाची असे मोटारसायकलवरून जात असताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असतान ते भरधाव वेगाने पुढे निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे जयसिंग जुनी व सोमनाथ घारुळे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी वरील गुन्हे त्यांचा साथीदार बल्लुसिंग टाक याच्यासह केले असल्याचे कबूल केले. बल्लुसिंग टाकलाही पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींकडून चोरी केलेल्या मालापैकी ७३ ग्रॅम सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही, एक डीव्हीआर, दोन मोबाईल, एक सँट्रो कार, एक मोटारसायकल असा एकूण ६,५०,०००/- रु.चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथक करीत आहे.