
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे, दि. ७ एप्रिल : महिला मंडळाच्या महिलांनी एका महिलेच्या घरात घुसून महिलेला व तिच्या मुलांना घरातून बाहेर काढत शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना काल (दि. ६ एप्रिल) सकाळी ११.०० वा. वानवडी येथे घडली आहे.
- याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी सहा ते सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मुलांसह त्यांच्या घरात असताना सहा ते सात महिला अचानक त्यांच्या घरात आल्या व ‘आता आम्ही येथे राहणार आहोत. तुम्ही ताबडतोब घर खाली करा’, असे फिर्यादी यांना म्हणू लागल्या. फिर्यादी यांनी त्या महिलांना ‘तुम्ही कोण आहात व येथे का आल्या आहात’ असे विचारले असता ‘आम्ही महिला मंडळाच्या महिला आहोत. आम्ही येथे महिला मंडळाचे ऑफिस उघडणार आहोत. तुम्ही घर खाली करा.’ असे त्या म्हणू लागल्या. फिर्यादींनी त्यांना ‘माझे पती बाहेर गेले आहेत. ते आल्यानंतर आपण बघू.’ असे म्हणून थांबण्यास सांगितले असता त्या महिलांनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला ढकलून शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून त्यांना घरातून बाहेर काढले.
पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उप निरीक्षक सुधा चौधरी करीत आहेत.