
पोलीस महानगर : परवेज शेख
- येरवडा, दि. १ एप्रिल : येरवडा येथील एका व्हिडीओ गेमच्या दुकानात पैशांच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनुराग पवार (वय-१९ वर्षे, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील साळवेकरनगरमधील भाजीमार्केटजवळ फिर्यादी अनुराग पवार व त्यांचा भाऊ शुभम पवार यांचे व्हिडीओ गेम झोन नावाचे दुकान आहे. दि. ३० मार्चला दु. १२.३० वा. फिर्यादी अनुराग त्यांच्या भावासह त्यांच्या व्हिडीओ गेमच्या दुकानात थांबले होते. त्यावेळी दोन आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी व्हिडीओ गेमच्या पैशांच्या कारणावरून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी अनुराग व शुभम यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच अनुराग यांनी त्यास विरोध केला असता आरोपीने त्याच्या कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून अनुराग यांच्या मानेवर मारून त्यांना जखमी केले. या प्रकारामुळे आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले.
या गुन्ह्याचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक वाघमारे करीत आहेत.