
वाघोली परिसरात गस्त घालत असताना घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना जेरबंद
पुणे : परवेज शेख
लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम वाघोली परिसरात गस्त घालत असताना घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघोली परिसरात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील, तसेच अप्पर पोलिस अधिक्षक बारामती यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस हवालदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, जनार्दन शेळके, धीरज जाधव, अक्षय नवले यांचे एक पथक नियुक्ती केले हे पथक वाघोली परिसरात गस्त घालत असताना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की घरफोडीतील सराईत गुन्हेगार आव्हाळवाडी चौकात येणार आहेत.
यावरुन या चौकात सापळा रचून राहुल यमनप्पा गायकवाड रा.लोहगाव व भरत स्वामी रा.लोहगाव या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. या दोन गुन्हेगारांकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता पायगुडेवस्ती, वाघोली येथे घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. या घरफोडीतील मुद्देमाल विनोद गणेश सिंग रा.धानोरी याच्या मार्फत उपेंद्र शिवपुजन राम लेबर वसाहत अमनोरा पार्क हडपसर यास विकल्याचे सांगितले.
यातील राहुल गायकवाड याच्यावर विमाननगर, वारजे माळवाडी, भोसरी, विश्रांतवाडी, बंडगार्डन येथे तर भरत स्वामी यांचेवर येरवडा, लोणीकंद, फरासखाना, विमाननगर येथे गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून अधिक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.